प्रकरण ५

अमेरिकन नाश्ता आणि वीस एकरांचा वॉलमार्ट

२४ सप्टेंबर, गुरुवार

२४ सप्टेंबर २०२६

नाश्ता की जेवण?

२४ सप्टेंबर, गुरुवार. सकाळी मुलाने आग्रह केला, म्हणून आम्ही अमेरिकन ब्रेकफास्टसाठी प्रसिद्ध असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये गेलो.

व्यवस्था अप्रतिम होती. स्वच्छता, टापटीप आणि बोलण्यातला आदर, सगळंच मनात भरलं. रेस्टॉरंटमध्ये फक्त अमेरिकन लोक, तेही कुटुंबांसह, दिसत होते. पण आपल्या देशात जसं कुणाकडेही बराच वेळ रोखून बघितलं जातं, तसं इथे कोणीच कोणाकडे बघत नव्हतं. प्रत्येकजण आपापल्या टेबलवर काय मांडलंय तेच पाहत होता; दुसऱ्या कोणाकडे अजिबात लक्ष नाही.

आम्हीच तेवढे सगळ्या अमेरिकन लोकांपुढे लहानखुरे दिसत होतो, जवळजवळ सहा फूट उंच, धिप्पाड, गोरेपान असे सगळेजण! तरीही आम्हाला कुठेही संकोच वाटला नाही; इतकी आदरातिथ्याची वागणूक होती.

ब्रेकफास्ट कसला! आमचं तर चांगलं जड जेवणच झालं होतं. पण सगळं इतकं "हायजिनिक" होतं की पोटभर खाऊनही अतिशय हलकं वाटत होतं.

अमेरिकन नाश्त्यासाठी आयहॉप (IHOP) रेस्टॉरंटमधील दालन आणि खाद्यसंस्कृती.

वीस एकरांचा वॉलमार्ट

मुलाने बिल भरलं. मग घरात लागणारं सामान, कांदे, भाजी, ब्रेड वगैरे, आणायला आम्ही निघालो, आणि त्या निमित्ताने त्याने आम्हाला अमेरिकन "मॉल" कसा असतो ते दाखवलं. वीस एकरांच्या आवारातला हा वॉलमार्ट (Walmart)!

ज्यांना चालायचा त्रास आहे, जे वयस्कर आहेत, त्यांच्यासाठी तिथे इलेक्ट्रिक बाईक्स ठेवलेल्या होत्या. म्हणजे आत किती चालावं लागत असेल, याची कल्पना न केलेलीच बरी!

सगळं सामान घेऊन बाहेर पडेपर्यंत दोन तास कसे गेले, ते कळलंच नाही.

वीस एकरांच्या विस्तीर्ण वॉलमार्ट सुपरमार्केटमधील दालने आणि खरेदीची लगबग.

मुलाचं ऑफिस

घरी येताना मुलाने त्याचं कामाचं ठिकाण, ऑफिस, दाखवलं. अतिशय शांत आणि स्वच्छ परिसर होता. दुपारी लंच ब्रेकनंतर सगळ्या स्टाफला बाहेर थोडा वेळ फिरायला जाण्याची परवानगी असते.

हे सगळं पाहून दुपारी दोन वाजता आम्ही घरी आलो.

"जब्या, हात लावायचा नाही!"

मुलाने आधीच ताकीद दिली होती. (जब्या म्हणजे मी! 😀) "तुला लहान मुलं दिसली की डोक्याला हात लावणं, हातात हात घेणं, शेकहँड करणं, हे सगळं भारतात चालतं; इथे अजिबात करायचं नाही. नाहीतर लगेच पोलिसांना फोन करतात!"

म्हणून मी थोडा सावधच होतो. पण इतकी गोंडस, बाहुलीसारखी, सोनेरी केसांची, गुबगुबीत मुलं दिसत होती की नुसतं चोरून बघण्याशिवाय पर्यायच नव्हता. तरीही मॉलमध्ये मोह आवरला नाही, एका लहानग्या बेबीच्या आई-वडिलांना मी विचारलंच, "Can I take video of your baby?" आणि त्यांनी "Yes, you can" म्हणून परवानगी दिली! 😀

इतकं काही बघून झाल्यावर आता घरीच थांबावं असं वाटत होतं. मुलाचा आग्रह होता, इकडे जाऊ, तिकडे जाऊ, पण आम्ही नाही म्हणालो.

निवडक छायाचित्रे

अमेरिकेतील एका सुंदर व स्वच्छ रस्त्यावरील दृश्य.
गाडीतून दिसणारे अमेरिकेतील विस्तीर्ण आणि सुरेख रस्ते.

सर्व प्रकरणांकडे परत