प्रकरण ६
इथं सगळं उलटंच!
शिस्त, स्वच्छता आणि उलट्या-सुलट्या सवयी
सप्टेंबर २०२६ (निरीक्षणे)
हॉर्नशिवायचा देश
अमेरिकेतली स्वच्छता, नियोजन आणि नियमांचं पालन, हे सगळं इथे अतिशय काटेकोरपणे केलं जातं. इतक्या दिवसांत इतकं फिरलो, पण हॉर्नचा आवाज ऐकायला मिळाला नाही. रस्ते, आम्ही राहतो तो परिसर इतका स्वच्छ की झाडाचं साधं पानसुद्धा पडलेलं दिसत नाही. म्हणूनच इथे लक्ष्मी भरभरून देते आहे, असं म्हणायला हरकत नाही.
सगळंच उलटं!
अमेरिकेत भारताच्या नेमकं सगळं काही उलटं आहे! आपल्याकडे इलेक्ट्रिकचा खटका खाली केला की लाईट लागतो, इथे तो वर करावा लागतो. 😀
आपल्याकडे रस्त्यावर डाव्या बाजूने चालवावं लागतं, इथे उजव्या बाजूने; आणि स्टेअरिंगसुद्धा आपल्याकडच्या उलट बाजूला.
लपलेल्या पाईपलाईन आणि तारा
घरात पाण्याच्या पाईपलाईन कुठून येतात, हे काही केल्या दिसत नाही. वॉश बेसिन, बाथरूम, किचन, सगळीकडे चोवीस तास गरम आणि गार पाणी; आणि वॉश बेसिनचं पाणीसुद्धा अतिशय शुद्ध, फिल्टर होऊनच येतं. रस्त्यावरच्या सगळ्या लाईट्सच्या वायरी अंडरग्राउंड असल्यामुळे कुठेच लोंबकळणाऱ्या तारा दिसत नाहीत.
असो, सांगावं तितकं कमीच आहे.