प्रकरण १
चष्मा घरीच राहिला!
हडपसर ते इस्तंबूल, प्रवासाची सुरुवात
निघण्याची तारीख पडताळणी बाकी (R01)
अमेरिकेला निघायचं म्हटलं की कोणाच्याही मनात शंभर काळज्या असतात. आमच्या बाबतीत मात्र एक गोष्ट निश्चिंत होती, अमेरिकेतल्या माझ्या मुलानेच येण्या-जाण्याची तिकिटं आणि बाकीचा सगळा खर्च केला होता. त्यामुळे कसलं "टेन्शन" नव्हतं.
हडपसरमधला निरोप
निघण्याचा दिवस उजाडला. प्रज्ञाच्या, म्हणजे माझ्या "हिच्या", हडपसरमधल्या वहिनी... वहिनी कसल्या, आईच्या मायेने सगळं काही करणाऱ्या! जेवणाचा डबा, मोठमोठ्या बॅगा आणि बाकीची सगळी पूर्तता त्यांनी अशी काही केली की आम्हाला कशाचीच उणीव भासली नाही.
आमच्या निरोपासाठी थोरला मुलगा, सून आणि छोटी नात आमच्या आधीच हडपसरला येऊन पोहोचले होते. सगळ्यांचा निरोप घेऊन रात्री साधारण नऊ वाजता आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो.
पण गाडी थोडी पुढे गेली असेल-नसेल, तोच फोन आला, प्रज्ञाचा चष्मा घरीच राहिला होता! नशीब इतकंच की थोरला मुलगा आमच्या पाठोपाठच येत होता. त्याने परत घरी जाऊन चष्मा आणला, आणि मग आम्ही पुन्हा मुंबईच्या वाटेला लागलो.
मध्यरात्रीची मुंबईवारी
पुणे–मुंबई मार्गावरची ती नवी "मिसिंग लिंक" पार करत आम्ही रात्री साधारण एक वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) पोहोचलो.
पहाटे पाच वाजून पंचवीस मिनिटांचं मुंबई–इस्तंबूल टर्किश एअरलाइन्सचं (Turkish Airlines) विमान होतं. त्यामुळे विमानतळावरच फ्रेश होऊन आम्ही इस्तंबूलच्या विमानात जाऊन बसलो.
तीस हजार फुटांवरची चव
काही वेळातच ब्रेकफास्ट आला. तीस हजार फूट उंचीवर जिभेची चव बदलते, असं ऐकलं होतं, आणि खरंच, आपण नेमकं काय खातोय, काय नाही, हे काही केल्या समजेना! 😀
असो. दुपारी साडेबाराच्या सुमारास मी इस्तंबूलच्या, जगातील सर्वात मोठ्या विमानतळांपैकी एका, विमानतळावर होतो. 👍
इस्तंबूलमध्ये उतरलो खरे, पण तिथे वेळ कसा सरला, तेच कळलं नाही. ती गोष्ट पुढच्या भागात.