प्रकरण २
सात वर्षांनंतरची भेट
इस्तंबूल ते डेन्व्हर
२६ ऑगस्ट २०२६
विमानतळ, की अख्खं गाव?
इस्तंबूलच्या या विमानतळाचा परीघच म्हणे ३७ किलोमीटरचा! आतमध्ये छोटी रेल्वे धावते, बॅटरीवर चालणाऱ्या स्वयंचलित ट्रॉल्या फिरतात.
डेन्व्हरचं विमान दुपारी साडेतीन वाजता होतं, त्यामुळे निदान थोडी विश्रांती मिळेल असं वाटत होतं. पण विमानतळ इतकं अफाट की तीन तास कसे गेले, ते कळलंच नाही. शेवटी पुण्यातून वहिनींनी दिलेला डबा खाल्ला आणि विमानात जाऊन बसलो.
चौदा तासांचा प्रवास
आता सलग चौदा तासांचा प्रवास होता. थकवा जाणवू लागला होता, पण झोप येणं काही शक्यच नव्हतं.
आणि ती वेळ आली
२६ ऑगस्टला रात्री साडेसात वाजता आम्ही डेन्व्हरला (Denver) पोहोचलो. मुलगा घ्यायला आला होता.
सात वर्षांनी मी माझ्या मुलाला भेटत होतो. मनात हुरहूर होती, उत्सुकता होती, आतुरता दाटून आली होती. आणि ती वेळ आली.
मुलाला समोर बघताच प्रज्ञा रडायलाच लागली. मलाही गहिवरून आलं होतं; पण म्हणतात ना, बापाला कमकुवत होऊन चालत नाही.
तो हातात मोठा पुष्पगुच्छ घेऊन आला होता, आणि अंगात पिवळा कोट. 🌹
भेट झाली, आणि डेन्व्हर विमानतळापासून वीस मिनिटांच्या अंतरावर असलेल्या घराकडे आम्ही निघालो. 👍
अमेरिकेतली आमची पहिली रात्र अशी सुरू झाली.